फॅमिली डॉक्टरचे महत्त्व

doctorआपल्या देशात आयुर्वेदासारख्या शास्त्राची जोड आधुनिक वैद्यकाला देऊन एक परिपूर्ण अशी आरोग्यव्यवस्था बनवायला हवी होती, पण झाले उलटेच! अजूनही ‘डॉक्टर कमी आहेत’ अशी बोंबाबोंब करून, नवीन वैद्यकीय महाविद्यालये उघडून देणग्या घेऊन डॉक्टर बनवण्यापेक्षा असलेल्या आयुर्वेदिक, होमियोपथिक डॉक्टरांना थोडेसे शिक्षण देऊन त्यांच्यातून अधिक परिपूर्ण जीपी किंवा फॅमिली डॉक्टर आपण बनवू शकतो. यूकेने त्यांच्याकडील डॉक्टरांच्या कमतरतेवर तोडगा काढलाय. त्यांनी त्यांच्या देशातील नस्रेसना विशेष प्रशिक्षण देऊन त्यांना एका ठरावीक परिघात आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली जी.पी.सारखे काम करण्याचा अधिकार दिला आहे. आणि आपण मात्र डॉक्टरांची जातीव्यवस्था बनवून स्वत:च्याच पायावर धोंडा मारून बसलो आहोत..

एके दिवशी माझी एक पेशंट तिच्या नवऱ्याबरोबर माझ्याकडे आली. स्त्रीरोगतज्ज्ञ असल्याने मी तिच्याकडे बघत म्हटले, ‘बोला मीनाताई, आज काय बुवा काम काढलंत?’ मीनाताई हसून म्हणाल्या, ‘डॉक्टर, आज मी यांना तपासायला आणले आहे. मला माहीत आहे तुम्ही स्त्रीरोगतज्ज्ञ आहात, पण माझ्या नवऱ्याला एकदा तुम्ही तपासाच. सारखं पोटात दुखतं त्यांच्या.’ मोठय़ा हुद्दय़ावर असलेला हा माणूस मोठय़ा हॉस्पिटलातील मोठमोठय़ा डॉक्टरांकडे जाऊन आला होता. साहेबांकडे भलीमोठी रिपोर्टस्ची फाईल होती.. सोनोग्राफी, एक्स-रे सारे काही झाले होते. मी साहेबांशी बोलायला सुरुवात केली. वेळी-अवेळी बाहेरचे खाणे, रात्री-अपरात्रीच्या पाटर्य़ा असा सगळा प्रकार होता. मी त्याला जंताचे औषध दिलं आणि पोटदुखी गायब! माझ्या स्पेशालिटीच्या बाहेरील गोष्ट मला उमजली, मग पोटाच्या विकाराचे तज्ज्ञ असणाऱ्या प्रथितयश डॉक्टरांना ती  का नाही समजली? कारण मी काही क्षणांसाठी माझी ‘स्पेशालिस्टगिरी’ बाजूला ठेवली आणि जनरल प्रॅक्टिशनर  किंवा ‘जीपीगिरी’ केली होती. छातीत दुखण्याचे त्रास घेऊन काíडयोलॉजिस्ट कडे जाणाऱ्या कित्येकांना शेवटी फॅमिली डॉक्टरच्या अ‍ॅसिडिटीच्या औषधाने गुण येतो, ही घटना आम्हा डॉक्टरांसाठी काही नवीन नाही.

फॅमिली डॉक्टर किंवा जीपी आणि स्पेशालिस्ट यांच्या कामातील फरक आम्हाला कॉलेजमध्ये एका प्रोफेसरांनी छान समजावून सांगितला होता. ते नेहमी एका उंच इमारतीचे उदाहरण द्यायचे. ते म्हणत, ‘त्याच इमारतीच्या गच्चीवर उभे राहा, तुम्हाला लांबवरचं क्षितिज दिसेल, इतर इमारती दिसतील, पण इमारतीच्या पायथ्याशी असलेल्या जमिनीवरची टाचणी दिसेल का? त्यासाठी तुम्हाला तळमजल्यालाच यायला हवे. म्हणजेच छोटय़ाशा परिसरातील बारीकशी गोष्ट शोधण्यासाठी तुम्हाला तळमजल्यावर उभे राहणे आवश्यक आहे, तर व्यापक दृष्टिकोन ठेवून अनेक गोष्टी बघायच्या असतील तर तुम्हाला गच्चीवर जायला हवे. नेमका हाच फरक स्पेशालिस्ट आणि जीपीच्या विचारसरणीत आहे आणि विशेष म्हणजे हे दोन्ही दृष्टिकोन वेगळे, पण अत्यंत गरजेचे आहेत, कारण रुग्णाच्या तक्रारी, शारीरिक तपासणी, इतर टेस्ट यांसारख्या जंजाळातून नक्की कुठल्या अवयवाचा किंवा सिस्टीमचा आजार आहे हे अनुमान बांधणे आणि मग खोलात जाऊन त्यावर उपाय करणे असे काम वैद्यकशास्त्राचे आहे. म्हणूनच स्पेशालिस्टइतकाच जनरालिस्ट  किंवा जीपीसुद्धा महत्त्वाचा ठरतो.’

गेल्या काही वर्षांत आपण मात्र जीपी ही संस्था जवळजवळ नामशेष करून टाकली आहे. बहुतांशी वैद्यकीय पदवीधर स्पेशालिस्ट होण्यासाठी धडपडत असतात. याचे कारण म्हणजे जीपी या संस्थेला ना तितका मानमरातब, ना तितका पसा! शिवाय जीपी म्हणजे केवळ पदवीधर आणि स्पेशालिस्ट म्हणजे द्विपदवीधर. त्यामुळे आपल्याकडे जीपी कमी आणि स्पेशालिस्ट जास्त अशी अवस्था झाली आहे. मग जास्त करून जीपीचा व्यवसाय हा आयुर्वेदिक किंवा होमियोपथिक डॉक्टर करताना दिसतात. कुठल्याही डॉक्टरला आवश्यक अशा छान बोलणे, धीर देणे, संपूर्ण कुटुंबाला वर्षांनुवष्रे ओळखणे व रुग्णाविषयी संपूर्ण माहिती असणे आणि ठळक निदान करणे  या मूलभूत गोष्टी अवगत असल्याने लोक त्यांच्याकडे जातात, पण इथे आपला कायदा त्यांच्या आड येतो. एका ‘पॅथी’चा डॉक्टर दुसऱ्या ‘पॅथी’ची औषधे देऊ शकत नाही, असे आपला कायदा म्हणतो. म्हणजे डॉक्टरांना माणसाला बरे करण्याचा, त्यांच्या ‘पॅथी’बाहेरील ज्ञान घेण्याचा किंवा ते वापरण्याचा कायदेशीर अधिकार नाही. वास्तविक पाहता आपण आपल्या देशातील आयुर्वेदासारख्या शास्त्राची जोड आधुनिक वैद्यकाला देऊन एक परिपूर्ण अशी आरोग्यव्यवस्था बनवायला हवी होती, पण झाले उलटेच! अजूनही ‘डॉक्टर कमी आहेत’ अशी बोंबाबोंब करून, नवीन वैद्यकीय महाविद्यालये उघडून देणग्या घेऊन डॉक्टर बनवण्यापेक्षा असलेल्या आयुर्वेदिक, होमियोपथिक डॉक्टरांना थोडेसे शिक्षण देऊन त्यांच्यातून अधिक परिपूर्ण जीपी किंवा फॅमिली डॉक्टर आपण बनवू शकतो. यूकेने त्यांच्याकडील डॉक्टरांच्या कमतरतेवर तोडगा काढलाय तो Nurse practitioner  च्या रूपाने. त्यांनी त्यांच्या देशातील नस्रेसना विशेष प्रशिक्षण देऊन त्यांना एका ठरावीक परिघात आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली जीपीसारखे काम करण्याचा अधिकार दिला आहे. आणि आपण मात्र डॉक्टरांची जातीव्यवस्था बनवून स्वत:च्याच पायावर धोंडा मारून बसलो आहोत.

 यूकेमध्ये जीपी होण्यासाठीसुद्धा विशेष शिक्षण घ्यावे लागते. माझे काही मित्र स्पेशालिस्टचे शिक्षण घेतल्यावरही तिथे जीपी करतात; परंतु जीपी होण्याच्या आधी त्यांना पुन्हा वेगळे शिक्षण घ्यावे लागले, फॅमिली डॉक्टरांबरोबर काम करावे लागले, कारण त्यांची जीपीकडे बघण्याची दृष्टी ही ‘स्पेशालिस्ट इन जॅक ऑफ ऑल’ अशी आहे. आपल्याकडे वैद्यकीय महाविद्यालयात शिकलेला डॉक्टर डिग्री मिळाली की लगेच दवाखाना उघडू शकतो. त्याला वैद्यकीय महाविद्यालयात शिकवतात कोण? स्पेशालिस्ट! आणि त्याच्याकडून अपेक्षा काय तर, त्याने दवाखाना उघडून जीपी करावी.

आपल्याकडील प्राथमिक स्तरावरील जीपी व्यवस्था बळकट आणि सक्षम नसल्याने लोकांचा कल हा सारखा स्पेशालिस्टकडे पळण्याचा झाला आहे. वर म्हटल्याप्रमाणे स्पेशालिस्ट शब्दाचा अर्थच मुळी ‘छोटय़ात छोटय़ा आवाक्याचा मोठय़ात मोठा तज्ज्ञ’. मग साहजिकच तशा महागडय़ा तपासण्या, तशाच महाग फी आणि तसे खर्च आणि हे सगळे कशासाठी, तर त्याच्या छोटय़ाश्या विषयाशी संबंधित प्रॉब्लेम  आहे की नाही हे ठरवण्यासाठी. साहजिकच प्रत्येक प्रॉब्लेम हा अधिकाधिक उच्च स्तरावर नेऊन सोडवण्याच्या प्रकाराने खर्च वाढतच जातो.

यूकेने मात्र खर्च आणि सेवा यांचा उत्तम ताळमेळ बसवण्याचा प्रयत्न त्यांच्या व्यवस्थेतून केला आहे. जीपी या संस्थेचा वापर रोग टाळणे किंवा लवकरात लवकर त्याचे निदान व्हावे यासाठी केला आहे. तिथे प्रत्येक व्यक्तीला कुठल्या तरी जीपीकडे स्वत:ची नोंद करावी लागते आणि मग त्या जीपीकडे तुमच्या जन्मापासूनची माहिती येते. माझा मित्र डॉ. सिद्धार्थ देशमुख हा लंडनमध्ये जीपी करतो. त्याच्याशी बोलताना या व्यवस्थेतील अनेक आíथक बाबी मला कळल्या. आपल्याकडे काही स्पेशालिस्ट किंवा हॉस्पिटल्स रुग्ण पाठवणाऱ्या जीपीला ‘इन्सेन्टिव्ह’  किंवा ‘कट’ देतात. यूकेत मात्र सरकारच जीपींना ‘इन्सेन्टिव्ह’ देते. महत्त्वाचे म्हणजे हा ‘इन्सेन्टिव्ह’  रुग्णाला हॉस्पिटलमध्ये न पाठवायला लागण्यासाठी दिला जातो! अहो आश्चर्यम! उदाहरणार्थ प्रत्येक जीपीला असे उद्दिष्ट दिले जाते की, त्याच्या रुग्णापकी ठरावीक टक्के लोकांचा रक्तदाब किंवा शुगर गेल्या वर्षांत किमान एकदा मोजलेली असून ती नॉर्मल असेल तर त्याला मोठ्ठा बोनस दिला जातो. त्यामुळे जीपी प्रत्येक रुग्णाच्या मागे लागून, त्याचा  रक्तदाब, शुगर तपासून, जास्त असल्यास औषधे देऊन ती नॉर्मल करण्याच्या मागे असतो. यामुळे साहजिकच आरोग्य तपासणी होते, रोगनिदान लवकर होते. शिवाय रक्तदाब प्रमाणात म्हणजे तितके हृदयविकार कमी, तितक्या आयसीसीयूतल्या भरती कमी, तितक्या हृदय शस्त्रक्रिया कमी.. म्हणजे तितका समाज अधिक तंदुरुस्त! मग काही जीपी धूम्रपान सोडवण्यासाठी, स्थूलता कमी करण्यासाठी मुद्दामहून वर्ग घेतात. या साऱ्यातून त्यांना पसा  मिळत असतो आणि सामाजिक आरोग्य सुधारत असते.

उपाययोजना करताना मदत मिळावी म्हणून जीपींना काही गाईडलाईन्स आखून दिलेले असतात, त्याबरहुकूम जीपी उपचार करतात. त्यामुळे साहजिकच उपचार करताना जीपीला आवश्यक तो आधार मिळतो आणि लहानसहान कारणांसाठी स्पेशालिस्टकडे जावे लागत नाही.

 थोडक्यात काय की, प्रत्येकाच्या घराजवळचा आणि मनाने जवळचा, शैक्षणिकदृष्टय़ा सक्षम, आरोग्य क्षेत्रातील (पुलंचा) ‘नारायण’ असलेला, लोकांच्या आरोग्याचा ताबेदार असा यूकेमधील जीपी शेकडो मोठय़ा हॉस्पिटल्सपेक्षा खूप मोलाची कामगिरी बजावतो!

– डॉ. निखिल दातार

(दै. लोकसत्तामध्ये शुक्रवार, दि. ३ जून २०११ रोजी प्रकाशित झालेला हा लेख)

Comments

comments