औषधे चुकीची वा चुकीच्या पद्धतीने दिली गेल्याने तसेच पेशन्ट व डॉक्टरांमधील संवाद खुंटल्याने कित्येक जणांच्या जीवावर बेतते. त्यामुळे सर्व स्तरावर अशा चुका टाळण्यासाठी व सुरक्षित वैद्यकसेवेचा प्रघात प्रचलित करण्यासाठी आता नामवंत डॉक्टरांनीच पुढाकार घेतला आहे. लक्षावधी पेशन्ट व डॉक्टरांनाही दिलासा देणारे ‘पेशन्ट्स सेफ्टी अलायन्स’ हे व्यासपीठ त्यातूनच रविवारी आकारास आले.
औषधे किंवा वैद्यकसेवा चुकीच्या पद्धतीने दिली गेल्याचे प्रमाण जगभरात शंभरास पाच ते सहा इतके आहे. विकसित राष्ट्रांमध्येही डब्ल्यूएचओच्या अभ्यासानुसार दहा पेशन्टमागे एकास अशा चुकीच्या औषध/उपचार पद्धतीमुळे दुष्परिणामाला सामोरे जावे लागते. भारतात तर ते कमालीचे अधिक असले, तरी त्याचे मोजमापच होत नाही. या प्रकाराचे प्रथम रिपोर्टिंग करणाऱ्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाऊ शकते. हे गैरप्रकार टाळण्यासाठी ‘पेशन्ट््स सेफ्टी अलायन्स’ची स्थापना करणार असल्याचे याकामी पुढाकार घेणारे डॉ. निखिल दातार यांनी सांगितले. या अलायन्समध्ये डॉ. स्नेहलता देशमुख, डॉ. संजय ओक, राज्य ग्राहक तंटा निवारण मंचाचे अध्यक्ष न्या. वग्यानी, हिंदुजा हॉस्पिटलचे सीईओ प्रमोद लेले, पोलिस अधिकारी प्रज्ञा सरवदे, संशोधक बाळ फोंडके, राजीव मधोक आदी वैद्यक व अन्य क्षेत्रातील मान्यवर मंडळी सहभागी आहेत.
पेशन्ट्स सेफ्टी अलायन्स काय करणार?
- दजेर्दार व सुरक्षित वैद्यकसेवेच्या मागणीबाबत पेशन्टना सजग करणे.
- पेशन्टना कार्यसत्रांद्वारे त्यांच्या हक्कांबाबत जागरुक करणे
- इंटरनेटवरून विकारांबाबतची तसेच अन्य माहिती शोधण्यास मदत.
- संसर्ग प्रतिबंधासाठी काय करावे?
- दिसण्यात तसेच नावांमध्ये सार्धम्य असल्याने औषधांचे होणारे घोटाळे टाळणे.
- चुका टाळण्यासाठी पद्धती बदलण्यास प्राधान्य.
- पेशन्टप्रमाणेच डॉक्टर व अन्य स्टाफचेही प्रबोधन.
- गरज भासल्यास कोर्टाच्या पायरीवर लढा.
महाराष्ट्र टाइम्स (२६ एप्रिल २०१२)